सार्वजनिक शौचालयांच्या सफाईची करणार पाहणी
पोलिसांच्या कामातील धोका आणखी वाढला
पुणे – शहरातील नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एकाबाजूला पोलीस रस्त्यावर उतरून 12 तास ड्युटी करत आहेत. तर दुसरीकडे विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये जात तेथील नागरिकांच्या घरांना तसेच सार्वजनिक शौचालय यांना भेट देत आवश्यक माहिती गोळा करून त्याचा अहवाल तातडीने देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हैराण झाले आहेत. करोनाची लागण पुणे पोलीस दलात झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना कायदा सुव्यवस्थे व्यतिरीक्त हे अतिरिक्त काम आणखी धोकादायक बनले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून दररोज नवनवीन आदेश आणि सूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जात असल्याने पोलीस दलातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून ते आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना करोना होऊ नये, यासाठी राज्य सरकार परिपत्रक काढून विविध उपाययोजना करण्यास सांगत आहे. तर दुसरीकडे करोनाचा अधिक प्रभाव क्षेत्र असलेल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तेथील सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर दिली आहे.
शहरातील ज्या मध्यवर्ती भागात करोनाचे अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तो भाग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी यापूर्वीच सील केला असून तेथे संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत आहे. या भागात असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी एक नमुना तक्ता तयार केला असून त्यानुसार माहिती गोळा करण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर टाकली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जो भाग सील केला आहे.
तेथे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी काम करायचे आहे. हे काम झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे. या भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दिवसातून तीनवेळा पाहणी करून तेथे औषध फवारणी केली आहे की नाही, हे पहायचे आहे. औषध फवारणी झाली नसल्यास ती करून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे बंधन घातले आहे.
… तर जबाबदारी कोण घेणार?
पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणीदेखील झाली आहे. त्यातच आवश्यक ती खबरदारी न घेता वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचारी यांना झोपडपट्टीमध्ये शौचालयांची स्वच्छता पाहण्यासाठी पाठवित आहेत. या कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, यामुळे पुढील काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नदेखील पोलीस कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
पालिकेची जबाबदारी पोलिसांवर
करोनाच्या भीतीमुळे अनेक भागांत पालिका कर्मचारी जात नाही. मात्र,पोलीस कर्मचाऱ्यांवर या भागात जाण्यास सांगितले जाते, अशी तक्रार कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. या भागात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक ती साधन सामुग्रीदेखील दिली जात नसल्याची ओरड केली जात आहे. पोलिसांचे काम रस्त्यावर कायदा सुव्यवस्था पाहणे किंवा लोकांना घरात थांबवणे हे असताना त्यांना झोपडपट्टीमध्ये जाऊन शौचालयांची माहिती घ्यायला लावणे म्हणजे त्यांना करोनाच्या संसर्गाच्या अधिक जवळ ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे.