जागतिक मंदी असूनही ब्रिक्‍स राष्ट्रांनी आर्थिक विकासाला गती दिली

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “ब्रिक्‍स’व्यापारी मंचासमोर प्रतिपादन ; भारत ही जगातली सर्वात खुली
आणि गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था

ब्रासिलिया (ब्राझील) : जागतिक आर्थिक विकासात ब्रिक्‍स राष्ट्रांचे 50 टक्के योगदान आहे. जागतिक स्तरावर मंदी असूनही ब्रिक्‍स राष्ट्रांनी आर्थिक विकासाला चालना दिली, लाखो लोकांना दारिद्रयातून बाहेर काढले आणि तंत्रज्ञान तसेच नाविन्यता यामध्ये सफलता प्राप्त केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ब्रिक्‍स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज ब्राझील येथे ब्रिक्‍स व्यापार मंचाला संबोधित केले. अन्य प्रमुखांनीही व्यापार मंचासमोरील भाषणात त्यांनी हे प्रतिपादन केले.

आंतरब्रिक्‍स व्यापार आणि गुंतवणूक उद्दिष्टं अधिक महत्वाकांक्षी असावीत असे सांगून देशातल्या व्यापाराचा खर्च कमी व्हावा यासाठी त्यांनी सूचना मागवल्या. पुढच्या ब्रिक्‍स शिखर परिषदेपर्यंत किमान पाच क्षेत्र निश्‍चित करून या क्षेत्रात ब्रिक्‍स राष्ट्रांकडून संयुक्त प्रकल्प स्थापन करता येईल, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

उद्याच्या शिखर परिषदेत नाविन्यतम ब्रिक्‍स नेटवर्क, भविष्यातल्या नेटवर्कसाठी ब्रिक्‍स संस्था यासारख्या महत्वाच्या उपक्रमांवर चर्चा होईल. मनुष्यबळावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या या प्रयत्नात खाजगी क्षेत्रांनाही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. पाच देशांनी परस्पर सामाजिक सुरक्षा कराराबाबतही विचार करावा असे पंतप्रधान म्हणाले.
राजकीय स्थैर्य, पूर्व अनुमान करण्याजोगी धोरणं आणि व्यापार स्नेही सुधारणा यामुळे भारत ही जगातली सर्वात खुली आणि गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.