…तर निधी अन्य ग्रामपंचायतीकडे वर्ग करा
तीर्थक्षेत्र विकास निधीचा योग्य नियोजन करून सोयी सुविधा पुरवण्याची मागणी करताना वासुली ग्रामपंचायतीला डोंगरावर काम करण्यास उत्सुक नसेल तर तीर्थक्षेत्र निधी परिसरातील अन्य ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
शिंदे वासुली – श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर अनेक अत्यावश्यक सुविधांची आवश्यकता आहे. डोंगरावरील शिवमंदिरापासून संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेल्या प्राचीन गुहेतील विठ्ठल-रखुमाई मंदिराकडे जाण्यासाठी दगडातील कोरीव पायऱ्यांलगत असलेली संरक्षणात्मक लोखंडी रिलींग जीर्ण होऊन शेवटच्या घटका मोजत आहे.
संतशिरोमणी तुकाराम महाराजांची तपोभूमी व साक्षात्कार भूमी म्हणजे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर. येथील प्राचीन महादेव मंदिर डोंगर परिसरातील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे, आंबेठाण, खालूंब्रे, कोरेगाव, शेलू – आसखेड आदि गावातील भाविकांचे प्रमुख आराध्य दैवत आहे. येथे कामांसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून तिर्थक्षेत्र विकास निधी दिला जातो. डोंगरावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वासुली ग्रामपंचायतीला हजारो रुपये निधी मिळतो. डोंगरासाठी ग्रामपंचायत वासुली, भामचंद्र डोंगर सप्ताह समिती व भामचंद्र डोंगर व परिसर विकास समिती ही स्वंसेवी संस्था, अशा तीन संस्था काम करतात; परंतु अत्यावश्यक मुलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयशी झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या वतीने कामांना सुरुवात केली असल्याचे समितीचे कार्यकर्ते व भांबोलीचे माजी सरपंच किसन पिंजण यांनी सांगितले. याकामी भांबोलीचे सरपंच सागर निखाडे सहकार्य करीत आहेत.