उपमुख्यमंत्री अजित पवार ः आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत
बारामती- आम्ही सर्वच जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडी एक आहे. विविध विषयांवर विविध मते असू शकतात; मात्र राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी मजबूत असल्याचे संकेत दिले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठीचे मतदान केल्यानंतर बारामतीत माध्यमांशी बोलत बोलत होते. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चेतून एकोप्याने काम करीत असल्याने त्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे कोणी काही शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. एनआरसी व एनपीआरच्या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी जी भूमिका मांडली आहे, तिच आम्हा सर्वांची आहे. पवार यांचे जे मत आहेत तेच पक्षाचे व आम्हा सर्वांचेही मत असल्याचे अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. माळेगाव कारखान्याबाबतीत सूज्ञ सभासद मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- अर्थसंकल्प 6 मार्चला सादर करणार
सोमवारपासून (दि. 24) राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.