उच्चशिक्षित असूनही सायकल व्यवसायाची गोडी

पेठमधील सुरेश धुमाळ यांची वडिलांप्रति कृतज्ञता

पेठ – 16 जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. बाबा आपल्या सगळ्याच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र. आई म्हणजे माया, प्रेम तर बाप म्हणजे जबाबदारी, कर्तव्य. अशाच या बाबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस जगभर फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.

या फादर्स डे च्या निमित्ताने पेठ मधील एक उच्च पदवीधर तरूण सुरेश भिकाजी धुमाळ हे आपल्या वडिलांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वडिलांचा 56 वर्षे जुना असलेला सायकल दुरूस्तीचा व्यवसाय आजही त्यांनी चालू ठेवला आहे. वडील भिकाजी पाटीलबुवा धुमाळ यांना देवाज्ञा होऊन दोन महिने झाले असताना आपल्या वडिलांचा हा व्यवसाय आजही त्यांनी सुरू ठेवला आहे. सकाळपासून दुपारपर्यंत ते दुकानावर काम करतात आणि 2 वाजता आपल्या कामाला जातात. हा त्यांचा दिनक्रम असून आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता म्हणून हा व्यवसाय ते करतात. त्यांना दोन भाऊ असून एक भाऊ तहसीलदार, तर दुसरा भाऊ शिक्षक आहे. स्वतःदेखील उच्चपदावर कामाला असून या व्यवसायाची कुठल्याही प्रकारची गरज नसताना तरीदेखील त्यांनी हा व्यवसाय चालू ठेवून वडिलांना वहिलेली श्रद्धांजली होय.

खरंतर बाप आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. कोणतीही परिस्थिती असली तरी त्याला निर्भिडपणे तोंड देणारा बापच असतो. या फादर्स डेच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.