वॉशिंग्टन : डेन्मार्कचा स्वयंशासित असलेला ग्रीनलॅंड हा प्रदेश विकत घेण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला आहे. हा प्रदेश बर्फाच्छादित असून ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांना तो विकत घेण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. दी वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत माहिती दिली आहे.
ग्रीनलॅंड हा नैसर्गिक साधनांनी परिपूर्ण प्रदेश असून त्याचे भूराजकीय महत्त्वही मोठे आहे. ग्रीनलॅंड हा डेन्मार्कचा स्वयंशासित भाग असून त्याचे क्षेत्रफळ 772000 चौरस मैल म्हणजे 20 लाख चौरस किलोमीटर आहे. हे बेट 18 व्या शतकातील असून तेथे 57 हजार लोक राहतात. ते तेथील मूळ इन्युट समुदायाचे आहेत. ग्रीनलॅंड बेट विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाबाबत व्हाइट हाऊसने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. डेन्मार्कच्या दूतावासानेही एएफपी या वृत्तसंस्थेने प्रतिक्रिया मागितली असता ती दिलेली नाही. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांना असे सांगितले होते,की कॅनडाच्या ईशान्येला असलेले ग्रीनलॅंड बेट साधनसंपत्तीने परिपूर्ण असून ते अमेरिकेसाठी फायद्याचे आहे. काहींच्या मते अध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली ती एक कल्पना आहे. व्हाइट हाऊस बाहेरील सूत्रांनी सांगितले,की ट्रम्प यांना तेथे कायदेशीर ताबा हवा असावा. अमेरिकेचा खुला हवाईतळ हा ग्रीनलॅंडमध्येच आहे. ट्रम्प यांनी परदेशातील मालमत्ता विकत घेण्यात स्वारस्य दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यांनी यापुर्वी उत्तर कोरियातील बंदरे ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.