राजकीय स्वार्थापोटी देशमुखांकडून मराठा समाजाचा दुरूपयोग : जाधव

सातारा  – छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींमधील मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या आचारविचारांचा वारसा जपत शेखर गोरे यांनी 80 टक्‍के समाजकारण व 20 टक्‍के राजकारण केले आहे. मात्र, “आमचं ठरलंय’कडून निवडणुकीत उभे असलेल्या प्रभाकर देशमुख यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा दुरुपयोग चालवला आहे, असा आरोप शेखर गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ म्हसवड येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. जाधव म्हणाले, शेखर गोरे यांनी गेल्या सात वर्षात सर्व जातीधर्मांच्या लोकांना बरोबर घेत त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत. त्यांनी कधीही जातीभेदाचे राजकारण केले नाही. मात्र, मराठा समाजासाठी व मतदारसंघातील जनतेसाठी काही न करता, निवडणुकीच्या तोंडावर उगवलेले अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख आपल्या राजकीय स्वार्थापोटी मराठा समाजाचा दुरुपयोग चालवला आहे.

मराठा समाज त्यांच्या दावणीला बांधलेला नाही. त्यामुळे मराठा समाज आपली जहागिरी आहे, असे समजू नये. मी गेली सात वर्षे शेखर गोरे यांच्याबरोबर काम करत आहे. या काळात कधीही त्यांच्याकडून भेदभाव अनुभवला नाही. प्रभाकर देशमुख यांच्याकडे प्रचाराचा कोणताच मुद्दा नसल्याने मराठा समाजाचा मुद्दा उचलत समाजात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम ते करत आहेत. अशा समाजविघातक प्रवृत्तीला सर्व जातीधर्मातील मतदारांनी जागा दाखवून द्यावी. राष्ट्रवादीसाठी काहीही न केलेले, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले की, आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मतदारसंघात आले आहेत.

सर्व जातीधर्माच्या लोकांना शेखरभाऊंकडून न्याय शेखर गोरे यांनी म्हसवड नगरपालिका निवडणुकीत नेतृत्व करत धनगर समाजाच्या तुषार वीरकर यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घालण्यासाठी मदत केली. सर्व जातीधर्मातील नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषद निवडणुकीत आंधळी गटातून मराठा समाजाच्या बाबासाहेब पवार यांना विक्रमी मतांनी निवडून आणले तर स्व. पोळतात्यांच्या दोन्ही सुनांना एकाच वेळी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देत त्यांना निवडूनही आणले.

पंचायत समितीत अनुसूचित जातीच्या रमेश पाटोळे यांना सभापतिपदी, धनगर समाजाच्या नितीन राजगे यांना उपसभापतिपदी निवडून आणले. मराठा समाजाच्या विजयकुमार मगर, सौ. कविता जगदाळे व तानाजी कट्टे यांना पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आणताना जातीभेद पाहिला नाही. शेखरभाऊ गोरे यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय दिला आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी शेखर गोरे, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)