कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांनी केली. त्यामुळे भारतासह अमेरिकेतील भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल तपास करून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे. या द्वेषमुलक गुन्ह्याची अधिकृत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी केली आहे.
कॅलिफोर्निया प्रांताच्या उत्तरेकडे असणाऱ्या डेव्हीस शहराच्या मध्यवर्ती उद्यानात महात्मा गांधी यांचा तांब्याचा सहा फूट उंच आणि 294 किलो वजनाचा पुतळा आहे. त्याची विटंबना करण्यात आल्याचे स्थानिक डेव्हीस एन्टरप्राईज डेली या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे. डेव्हीसचे नगराध्यक्ष लुकास फ्रेरिच म्हणाले, हा पुतळा काढून या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवावा. या पुतळ्याची विटंबना नेमकी कधी झाली आणि त्याच हेतू काय होता, याबाबत अद्याप तपास यंत्रणांना नेमकी माहिती मिळाली नाही.
डेव्हीसच्या नागरिकांच्या सांस्कृतिकतेची प्रतिमा जपणाऱ्या या पुतळ्याच्या विटंबनेची दखल आम्ही गांभीर्याने घेतली आहे, असे डेव्हीसचे पोलिस उपप्रमुख पॉल डोरोशेव्ह यांनी सांगितले. दरम्यान, पुतळ्याची नासधूस अस्वीकारार्ह आहे, असे आम्ही अमेरिकेच्या गृहखात्याला कळवले आहे. त्यासोबत हा कट रचणाऱ्यांवर लवकरात लवकर न्याय केला जाईल, अशी आशा असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
शांतता आणि न्यायाचे तसेच आंतरराष्ट्रीय आदराचे प्रतिक असणाऱ्या व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या कृतीचा भारत सरकार निषेध करत आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने अमेरिकेच्या गृहखात्याकडे नेले आहे. या घटनेच्या सखोल तपासाची मागणी केली आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. सनफ्रान्सिस्कोमधील भारतीय दुतावासाने हे प्रकरण स्वतंत्रपणे डेव्हीसमधील पोलिसांकडे नेले आहे, अशी पुस्तीही त्यात जोडली आहे.
भारतद्वेष्ट्यांचा पुतळ्याला विरोध
हा पुतळा चार वर्षापुर्वी भारत सरकारने भेट दिला होता. त्यावेळी स्थानिक नगर पालिकेने त्याची उभारणी केली होती. त्याला काही गांधी विरोधी आणि भारत विरोधी संघटनांनी विरोध करत निदर्शने केली होती. भारतातील अल्पसंख्यांकांची संस्था असे नाव असलेल्या संघटनेने त्याला विरोध सुरू केला.
मात्र, डेव्हीसच्या नागरिकांनी हा पुतळा उभा करण्याच्या बाजूने कौल दिला होता. तेंव्हापासून या संघटनेने हा पुतळा काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
अमेरिकन भारतीय संतप्त
अमेरिकन भारतीयांमध्ये या प्रकारावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत फ्रेंड ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनलचे गौरांग देसाई म्हणाले, काही हिंदुद्वेष्ट्या आणि भारतविरोधी संस्था आणि खलिस्तानी विलगतावाद्यांकडून विद्वेष पसरवण्याचा प्रकार अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे.
या शक्ती केवळ भारतीय महान व्यक्तींमत्वांबात द्वेष पसरवतात, असे नव्हे तर त्यांनी भारतावरील इयत्ता सहावी आणि सातवीच्या पुस्तकांत असणारा धडा काढायला लावला होता. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे कॅलिफोर्निया प्रशासनाने हा निर्णय बदलला.