उपअधीक्षकांकडून पोलीस कर्मचाऱ्यास भरचौकात मारहाण

नगर  – जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यावर ड्यूटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व त्यांच्या गाडीवरील चालकाने विनाकारण मारहाण केल्याची घटना मंगळवार, दि.3 संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात उपअधीक्षक अजित पाटील व त्यांच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर भास्कर तावरे (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.फिर्यादी पोलीस सागर तावरे हे नगर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तावरे हे मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या गेटजवळ मित्रासोबत बोलत उभे होते. त्यावेळी अजित पाटील त्याठिकाणी आले.

त्यांनी काही चौकशी न करता तावरे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तोपर्यत याठिकाणी गर्दी झाली होती. तावरे यांना मी पोलीस आहे, अधिक्षक साहेबांच्या बंगल्यावर असतो असे सांगितले तरी देखील पाटील यांनी तावरे यांना मारहाण केली. तसेच तावरे यांना दुचाकीवरून खाली पाडले. पाटील यांच्या चालकाने तावरे यांना उभे करून दोन्ही हात पकडून ठेवले,त्यानंतर पाटील यांनी तावरे यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.

याप्रकरणानंतर तावरे यांनी पोलीस अधिक्षकांना घडलेल्या घटनेची माहिती दूरध्वनीवरून दिली. दरम्यान,या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तावरे यांना हे प्रकरण वाढवू नये यासाठी प्रयत्न केले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.अखेर पोलीस शिपाई तावरे यांनी तक्रार देण्याचा निर्णय घेत पोलीस उपअधिक्षक अजित पाटील व त्यांच्या चालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)