पद पुन्हा आले रिपाइंकडे
पुणे – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून मित्रपक्ष रिपाइंला पुन्हा उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यमान उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पदाचा राजीनामा मंगळवारी दुपारी महापौरांकडे सोपविला आहे. दरम्यान, रिपाइंकडून या पदासाठी पक्षाच्या विद्यमान गटनेत्या सुनीता वाडेकर यांचे नाव चर्चेत आहे. शेंडगे यांनी राजीनामा देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून पक्षाच्या आदेशानुसार, राजीनामा दिला असल्याचे शेंडगे यांनी सांगितले.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत रिपाइंने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यात रिपाइंचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने रिपाइंला उपमहापौरपदासह स्थायी समितीत एक सदस्यपद दिले होते. त्यामुळे पहिल्या वर्षी पक्षाकडून उपमहापौरपदासाठी नगरसेवक नवनाथ कांबळे यांना संधी देण्यात आली. मात्र, पुढील दोन महिन्यांतच कांबळे यांचे अकस्मित निधन झाले. त्यानंतर रिपाइंकडून हे पद डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना देण्यात आले. मात्र, महापालिकेत धेंडे यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा झाल्यानंतर भाजपने हे पद पुन्हा आपल्याकडे घेत त्या ठिकाणी नोव्हेंबर 2019 मध्ये नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी दिली. तर, दोन महिन्यांपूर्वी भाजपकडून पुन्हा शहरात पदाधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या.
त्यात, आधी सभागृह नेते धीरज घाटे यांचा राजीमाना घेत सभागृहनेतेपद भाजपने स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांना दिले. त्यावेळी रिपाइंने उपमहापौरपद पुन्हा पक्षाला मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, भाजपकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष बदलाबाबत चाचपणी केली जात असल्याने उपमहापौरपदही आपल्याकडे ठेवले होते.
मात्र, पक्षाकडून महापौरपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडेच तर स्थायी समिती अध्यक्षपद हेमंत रासने यांच्याकडेच ठेवले. त्याचवेळी रिपाइंकडूनही वारंवार उपमहापौर पदाची मागणी केली जात होती. हे पद आता रिपाइंला दिले जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.