पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची मोटार फोडली

ऍम्ब्युलन्स वेळेत मिळत नसल्याचा आरोप : स्मशानभूमीतही थांबावे लागतेय ताटकळत 

पुणे – सख्ख्या साडूचे करोनामुळे निधन झाले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर दोन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी केवळ ऍम्ब्युलन्स मिळण्यात तीन तास आणि स्मशानभूमीत दोन तास वाट पाहावी लागली. यावर कात्रज येथील नगरसेवक आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांची मोटाराची काच फोडत आपला राग व्यक्‍त केला. 

मोरे यांच्या साडूचे रविवारी दुपारी करोनामुळे निधन झाले. भारती हॉस्पिटल येथून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. यासाठी महापालिकेच्या व्हेइकल डेपोकडे ऍम्ब्युलन्स मागितली; परंतु सातत्याने फोन करूनही तीन तास झाले, तरी ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. यानंतर ती मिळाली परंतु स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये अगोदरच एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते आणि दोन पार्थिव असलेल्या दोन ऍम्ब्युलन्स तेथे रांगेत होत्या.

एकच विद्युतदाहिनी असल्याने तेथेही वाट पाहात रात्रीचे सव्वादहा वाजले. परंतु यादरम्यान संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी आणि व्हेईकल डेपोच्या अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्यांबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी केल्याने मोरे यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी सोमवारी सकाळी घोले रस्ता येथील क्षेत्रीय कार्यालयात जाऊन व्हेईकल डेपोचे प्रमुख उपायुक्त नितीन उदास यांच्या मोटारीची तोडफोड केली.

‘करोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता बाधितांची केवळ विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अगोदरच जिवंतपणी त्यांची उपचारासाठी फरफट सुरू असताना मृत्यूनंतरही त्यांची हेळसांड होत असल्याबद्दल जनतेत तीव्र प्रतिक्रिया आहेत. ग्रामीण भागात विद्युत दाहिनी नाहीत. तेथे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. किमान मृत्यूची संख्या विद्युत दाहिनीपेक्षा अधिक असताना पुण्यातील स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीनेही अंत्यसंस्कार केले जावेत. परंतु सर्वच पातळ्यांवर “फेल’ ठरलेल्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक माझ्या माध्यमातून झाला,’ असे मोरे म्हणाले. 

सर्व खासगी ऍम्ब्युलन्स प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. अवघ्या दीड किमी अंतरापर्यंत मृतदेह न्यायला नगरसेवकांना ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीत. तर सर्वसामान्यांना किती दिव्यांना सामोरे जावे लागत असेल? माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या मृत्यूनंतरही अधिकारी गांभीर्याने नियोजन करत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
– वसंत मोरे, नगरसेवक, मनसे 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.