मुंढवा, दि.12 (प्रतिनिधी) -करोनाचे निर्बंध जरी शिथील झाले असले तरी गणेशोत्सवाच्या काळातील नियम लागू राहतील. गणेश मंडळांना पाच वर्षांचा परवाना दिला जाणार आहे. परंतु, मंडळाचे पदाधिकारी पाच वर्षे बदलता येणार नाहीत, हे लक्षात घ्या, अशी सूचना झोन-5च्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी केली.
मुंढवा पोलीस स्टेशनतर्फे गणेश उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिटिंगचे आयोजन तुलसी हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी सदर सूचना केली.
नम्रता पाटील म्हणाल्या की, केशवनगर भागात गणपती मूर्तीचे कारखाने आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे गणेशमूर्ती खरेदी करण्यास नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते यामुळे महानगरपालिकेने येथील रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत. या काळात पोलीस कर्मचारी नेमण्यात येतील. मंडळांनी नियमांचे उल्लंघन करू नये. सर्वांना यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा करावयाचा आहे. यावेळी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस एल. आय. बी. तानाजी देशमुख यांनी केले.