“चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलेन”

आयकर विभागाच्या कारवाईबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांची प्रतिक्रिया

पुणे – “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचे नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी पवार यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा “पाहुणे’ असा उल्लेख केला. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असे सुध्दा पवार यांनी यावेळी सांगितले.

विधानभवन येथे करोना आढावा बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आयकर विभागाने उपमुख्यमंत्री पवार यांचा मुलगा पार्थ तसेच नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ही चौकशी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. यावर विचारले असता पवार म्हणाले, “आता सध्या चौकशी सुरू आहे. आयकर विभाग त्यांचे काम करत आहे. विभागाला कोणत्याही कंपनीवर धाडी टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य, काय अयोग्य आहे? याची ते चौकशी करतात. त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही. त्यांची चौकशी करुन ते जातील.’

“माझी भूमिका स्वच्छ असते. मी सरळमार्गी आहे. कोणी कर बुडवू नये, म्हणून मी आवाहन करत असतो. कराचा हा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे आर्थिक शिस्त मोडायची नाही,’ असे पवार यांनी सांगितले. एका साखर कारखान्यामध्ये सुमारे 500 ते 700 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. काहींना साखर कारखाने चालवायला जमले नाहीत. ते कारखाने देशोधडीला लागले आहेत. काही कारखान्यांना एफआरपीची रक्कम देणेही शक्‍य झाले नसल्याचे पवार यांनी सांगितले.

विरोधकांना आव्हान
किती कारखाने विकले गेले, कोणत्या किंमतीला विकले, कोणी विकत घेतले, कोणामुळे विकले गेले, कारखान्याचा मालक कोण आहे, कारखाना कोण चालवत आहे, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नियमांचे पालन झाले की नाही, हे सर्व मी पुराव्यानिशी दाखविणार आहे, असे सांगत पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले.

लखमीपूरची घटना काळिमा फासणारी
लखीमपूर येथे शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्याची घटना घडली. काळिमा फासणारी ही घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी असणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.