पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संपूर्ण कामकाज नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. नियोजन विभाग हा पवार यांच्याकडे असून त्यामुळे या महामंडळाचे प्रस्ताव लवकर मार्गी लागणार आहे.
मागील महिन्यात शासनाने सारथी संस्थेचा कारभार सुध्दा नियोजन विभागाकडे हस्तांतरीत केला. आता, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारसुध्दा पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रस्तावानुसार स्थापन करण्यात आली आहे. महामंडळाची कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकरण करण्यात आली असून महामंडळाचे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे असून महामंडळातील संचालक सदस्य संख्या जास्तीत जास्त 15 इतकी आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा सामाजिक विकास करणे तसेच बेरोजगार तरुणांकरिता रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याकरिता महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या आर्थिक व प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागा ऐवजी आता नियोजन विभागाकडे सोपविण्यात आली आहे.