लोणंद – लोणंदचे उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्याविरोधात 12 नगरसेवकांनी नगरध्यक्ष सचिन शेळके-पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोणंदचे उपनगराध्यक्ष किरण पवार हे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती आहेत. गेल्या वर्षभरात आरोग्य समितीची एकही बैठक झाली नाही. गोटे माळ येथे नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीखाली गेले दीड वर्ष कचरा टाकला जात असून त्याबाबत पवार यांनी ठोस भूमिका घेतली नाही. नगरसेवक व नागरिकांच्या सूचना, कल्पना यांच्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करत आहेत.
घंटागाड्यांबाबतच्या समस्यांबाबत नागरिक नगरपंचायतीत आल्यावर उपनगराध्यक्ष केबिनमध्ये कधीच वेळेवर भेटत नव्हते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाण्याच्या टाकीखालील कचरा उचलण्याचे टेंडर त्यांनी रद्द केल्याने कचरा तिथेच पडून आहे. उपनगराध्यक्ष नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
या ठरावावर हणमंत शेळके, विकास केदारी, श्रीमती शैलजा खरात, सौ. हेमलता कर्णवर, राजेंद्र डोईफोडे, सौ. कृष्णाबाई रासकर, सौ. स्वाती भंडलकर, पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके, सौ. लीलाबाई जाधव, योगेश क्षीरसागर, सौ. दीपाली क्षीरसागर यांच्या सह्या आहेत.