धनकवडीतील करोना चाचणी केंद्राची पाहणी
कात्रज – करोनाच्या टेस्ट पुणे शहरात मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार सातत्याने आढावा बैठक घेत आहेत. सर्व मिळून आपण लवकरच करोनाच्या संकटवर मात करू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. केरोनाच्या संकट काळात डॉक्टर, पोलीस, कर्मचारी यांच्या कामाला आपण सलाम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातर्फे लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुद्देशीय भवन (कोविड-19) संसर्ग चाचणी केंद्राची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या केंद्रात दररोज अँटिजेन किटद्वारे सुमारे 190 ते 210 रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. परिसरातील नागरिकांना यामुळे सुविधा निर्माण झाली असल्याचे विशाल तांबे यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले.
दरम्यान, यावेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांच्या विकासनिधीतून चैतन्यनगरमध्ये (सर्वे नं. 28) उभारण्यात आलेल्या ओपन जिम, नवीन वॉटर टॅंकर, विरंगुळा केंद्राचे उद्घाटनही खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, नगरसेविका अश्विनी भागवत, माजी नगरसेवक संतोष फरांदे, काका चव्हाण आदी उपस्थित होते.