फलटण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी काही दिवसांमध्ये फलटण दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने मिशन लोकसभा हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्री व राज्यातील ज्येष्ठ, कनिष्ठ मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पुन्हा फडकण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आता लोकसभा मतदारसंघात दौरे करीत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघामधून गत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर प्रचंड बहुमताने निवडून आले. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार विजयी होण्यासाठी पक्षाचे केंद्र सरकारमधील व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणसह माण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातारा जिल्ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ व माण- खटाव विधानसभा मतदारसंघ असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील फलटणला राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर माण विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे प्रतिनिधित्व करीत आहेत.