पिंपरी -परिसरात गस्त घालण्यसाठी महापालिकेकडून 50 स्मार्ट बाइक पोलिसांना देण्यात आल्या. तसेच अग्निशामक दलासाठी सहा फायर बाइकही देण्यात आल्या. या सर्व वाहनांच्या ताफ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम महापालिकेच्या मुख्यालयात पार पडला.
यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेसात वाजता महापालिका मुख्यालयात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र अजित पवार हे त्यापूर्वीच सकाळी सात वाजताच महापालिका मुख्यालयात आले. जवळपास अर्धा तास त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात महापालिका आणि पोलिसांच्या कामातील अडचणीबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी वायसीएम रुग्णालयात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. याबाबतची कागदपत्र पवार यांनी मागितली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका भवनातील उद्योग सुविधा कक्ष आणि सीएसआर सेलच्या कक्षाचे उद्घाटन केले. त्यानंतर महापालिका भवनाच्या प्रांगणात येऊन त्यांनी पोलिसांकरिता महापालिकेने दिलेल्या 50 स्मार्ट बाइकच्या चाव्या प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांच्याकडे हस्तांतरित केल्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्यावतीने मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी फायर बाइकच्या चाव्या स्वीकारल्या. त्यानंतर ग्रीन मार्शल पथकाकरिता हॅन्ड हेल्ड डिव्हाइसचे वाटप करण्यात आले. या पथकात असलेलया तृतीयपंथीयांनी या डिव्हाइसचा स्वीकार केला. त्यानंतर दुचाकींच्या या ताफ्याला पवार यांनी हिरवा झेंडा दाखविला. अग्निशामक दलाच्या फायर बाइक यांनी हवेत पाणी उडवत आणि दुचाकीवरील पोलीस कर्मचारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चालत्या दुचाकीवरून मानवंदना दिली.