‘निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

शिर्डी :- निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.





