पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने चिंचवड अॅाटो क्लस्टर येथे तीन दिवसीय पर्पल जल्लोष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सलवती दिली जाते त्याचप्रमाणे अपंगांनाही मालमत्ता करात ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवला असून त्याला मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात पाच टक्के म्हणजेच ६५ लाख अपंग आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दिलेल्या निधीपैकी ठराविक निधी अपंगासाठी खर्च केला जाईल, याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अपंगांना आत्मनिर्भर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
पालिका प्रशासनाला आवाहन
अपंगत्वाचे प्रमाणपत्र केवळ वायसीएम रुग्णालयात मिळत आहे. पुण्यातील ससून आणि उपजिल्हा रुग्णालयातही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण कारवाई करत असताना अपंग फेरीवाल्यांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने कारवाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, उमा खापरे, सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश आगरवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त डॅा. राजेंद्र भोसले पीएमआरडीचे आयुक्त योगेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे उपस्थित होते.