पुणेः बारामती येथील रेल्वे मैदानावर २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या भाषणावेळी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षांपासून राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चार स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्पर्धेच्या व्यासपीठावरून केली.
या कार्यक्रमाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, प्रशांत काटे, प्रशांत सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थिती होते.
राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कबड्डी, खोखो, व्हाॅलीबाॅल, कुस्ती या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करतो. सुरुवातीला या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारच्या वतीने २५ लाख रुपयांचा निधी दिला जात असे. त्यानंतर तो निधी ७५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला, असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
तसेच आता राज्याचा अर्थमंत्री या नात्याने या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढील वर्षांपासून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर करतो. खेळ चांगला झाला पाहिजे, खेळाडूंना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा यामागे हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या कबड्डी स्पर्घेत राज्य सरकारच्या वतीने २० लाखांची बक्षीसे आहेत. तर यामध्ये बारामतीकरांच्या वतीने २५ लाखांची भर घालण्यात आली आहे, असे देखील पवार यांनी सांगितले.
विनंती करून स्पर्धेसाठी बारामतीमध्ये पोहचलो
आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. या दौऱ्यात आमदारांसोबत संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांना विनंती करून बारामतीमध्ये पोहचलो असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. तसेच पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॅालप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना तिथे थांबवे लागले आहे. यामुळे या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित राहू शकणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.