पुणे- ग्रामीण भागातील करोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहे. करोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच, ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ऍप तयार करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
करोना विषाणू उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.