मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोनामुक्त झाले असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत.
थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले.
करोनाच्या काळात सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते.
करोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता उपचारानंतर ते करोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे.