कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी समन्वयाने काम करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक ज्‍येष्‍ठ नेते तथा खासदार शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच अधिकाऱ्यांनी त्‍यांना नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोमेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सर्वांनी समन्‍वयाने काम केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा – ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार

ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करण्‍यात यावी, तसेच कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या सूचना केल्‍या. प्रतिबंधीत क्षेत्राचाही नियमित आढावा घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्‍क आकारणी होणार नाही यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही ते म्‍हणाले.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा आदीं बाबतची माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली.

आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वॉर रुम राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना आदींची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.