वाघोली – महावितरण हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत वाघोली येथे शाखा कार्यालय कार्यरत आहे. या शाखा कार्यालयावर कामाचा ताण वाढत असल्याने त्याचे विभाजन व्हावे यासाठीचा प्रस्ताव पाठविला होता. शासन स्तरावर हा प्रस्ताव प्रलंबित आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.
वाघोली तालुका हवेली या गावात हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत महावितरणची वाघोली शाखा कार्यरत आहे सदर शाखेमध्ये 71000 महावितरणचे ग्राहक आहे.
वाघोली चे क्षेत्र हे चाळीस किलोमीटरपेक्षा वरती आहे, त्यामध्ये 27 उच्च दाब वीज वाहिन्या कार्यरत आहे व वीज वाहिन्यांची सगळी मिळून एकूण लांबी कमीत कमी साडेतीनशे किलोमीटर आहे. तरी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकामी सदर शाखेचे विभाजन करणे गरजेचे असून तात्काळ शाखेचे विभाजन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, रामभाऊ दाभाडे, बाळासाहेब सातव पाटील ( गवळी)यांनी शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
वाघोली मधून मासिक महावितरण उत्पन्न अंदाजे 9 कोटी रुपये येत असते. सध्या वाघोली शाखेमध्ये फक्त एक शाखा अभियंता व तेवीस कर्मचारी कार्यरत आहे. लवकरात लवकर महावितरणच्या शाखेचे विभाजन करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी उपमुख्मंत्री अजितदादा पवार यांचेकडे निवेदाद्वारे केली आहे.