अनेक महत्वाच्या संस्थाच्या निधीत कपात
खेलो इंडियासाठी 291.42 कोटींची तरतूद
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात इतर विभागांसाठी भरीव तरतूद करणाऱ्या सीतारामन यांनी क्रीडा खात्याला निराश केलेले दिसून येत आहे. 2019-20च्या तुलनेत यंदा केंद्रीय क्रीडा खात्याला केवळ 50 कोटी रुपये वाढवून देण्यात आलाला आहे. क्रीडा विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2826.92 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी संकल्पापैकी एक मानल्या जाणाऱ्या खेलो इंडियासाठी 291.42 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
खेलो इंडियासाठी देण्यात आलेल्या निधीमुळे देशभरातील इतर क्रीडा संघटनांच्या वाट्याला कमी निधी येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा संघटनेला गेल्या वर्षाच्या तुलनेत 55 कोटी रुपयांची कपात करत 245 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. याव्यतिरीक्त क्रीडापटूंसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीमध्येही कपात करण्यात आली आहे.
देशातील महत्वाच्या क्रीडा संघटनांवर देखरेख करणारी साई या संस्थेच्या पदरातही यंदा निराशाच पडली आहे. चालू वर्षासाठी साईने 615 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र अर्थमंत्रालयाने 500 कोटींचाच निधी मंजूर केला आहे. देशभरातील खेळाडूंची राष्ट्रीय शिबीरात सोय करणं, त्यांना सरावासाठी योग्य जागा, प्रशिक्षण, डाएट यासारख्या महत्वाच्या गोष्टी साई’च्या अखत्यारीत येतात. त्यामुळे एकंदरीतच क्रीडा खात्यात निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पामुळे नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे.