मुंबई – खनिज तेलाच्या स्थिर किमती शिवाय इतर अनेक बाबी रुपयाच्या मूल्याच्या दृष्टिकोनातून नकारात्मक आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून रुपयाच्या मूल्यात एकतर्फी सुरू असलेली घसरण गुरुवारी जारी राहिली. गुरुवारी रुपयाचा दर पुन्हा चार पैशांनी कमी होऊन 84 रुपये 43 पैसे प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांंकी पातळीवर गेला.
सध्याच्या परिस्थितीत रुपयाचे आठ ते दहा टक्के अवमूल्यन होऊ देणे गरजेचे आहे असे काही विश्लेषकाकडून सांगितले जाते. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून डॉलर इंडेक्स वाढत आहे. मुख्य सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 106.76 अंकावर आहे. याचा अर्थ रुपयासह इतर जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलर बळकट होत आहे.
असे असतानाच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे या कर्जरोख्यात जागतिक गुंतवणूक वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास परदेशी गुंतवणूकदार दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यावर परिणाम होत आहे. अशातच भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक आकडेवारी जाहीर होत आहे.
आज सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताची परकीय व्यापारातील तूट ऑक्टोबर महिन्यातवाढवून 27.14 अब्ज डॉलरवर गेली आहे. किरकोळ आणि घाऊक किमतीवर आधारित महागाई वाढत असल्यामुळे व्याजदर कपात लांबणीवर पडणार आहे. या सर्व बाबींचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. रुपया आणखी काही प्रमाणात घसरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्या प्रमाणात महागाई भर पडणार आहे. मात्र भारताकडे बराच परकीय चलन साठा असल्यामुळे या आघाडीवर लघु ते मध्यम पल्ल्यास चिंता करण्याची गरज नाही असे विश्लेषकांनी नमूद केले आहे.