बिहारमध्ये शिवसेनेचे ‘पानिपत’; अनेक उमेदवारांचे डिपॉझिट ‘जप्त’

पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या “एनडीए’विरोधात राजदप्रणीत कॉंग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले आहे.

मात्र त्याचवेळी या निवडणुकीमध्ये 50 जागा लढवणाऱ्या शिवसेनेचे पानिपत झाले असून त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 22 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्या खालोखाल जेडीयू 15 टक्के आणि कॉंग्रेसला 9 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला 0.05 टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक 1.74 टक्के मते मिळाली आहेत.

महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फरसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीला 0.23 टक्के मते मिळाली आहेत.

अद्याप मतमोजणी सुरु असली तरी अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार खूपच मागे पडले असून मतांची ही टक्केवारी वाढण्याची शक्‍यता अगदीच कमी आहे. शिवसेनेला नोटाहूनही कमी मते मिळाल्याची ट्‌विटवरही चर्चा आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्रातील मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. याचवेळी शिवसेनेने बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.