Delhi Assembly Election 2024: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. दिल्लीतील ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तथापि, काँग्रेसने आपल्या मतांचा वाटा दोन टक्क्यांहून अधिक वाढवला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ४.२६ टक्के मते मिळाली होती, तर आता त्यांना सुमारे ६.४ टक्के मते मिळाली.
दिल्ली ‘आपदे’तून मुक्त – नरेंद्र मोदी
दिल्लीच्या जनतेमध्ये आज समाधान आणि उत्साह दिसून येत आहे. उत्साह विजयाचा आहे आणि समाधान दिल्ली ‘आपदे’तून मुक्त झाल्यामुळे आहे. मी दिल्लीकरांना वंदन करतो, कारण त्यांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. मी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानतो, दिल्लीने मनापासून आमच्यावर प्रेम केले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले, दिल्लीच्या विजयाने अराजकता, अहंकार आणि आपदा यांचा शेवट झाला आहे. या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिले. तुम्ही सगळे कार्यकर्तेही या विजयाचे वाटेकरी आहात. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाच्या शुभेच्छा देतो. दिल्लीच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की, दिल्लीची मालकी ही फक्त आणि फक्त जनतेकडे आहे. ज्या लोकांना दिल्लीचे मालक असण्याचा अहंकार होता त्यांना वास्तवाची जाणीव दिल्लीकरांनी करुन दिली.
दिल्लीच्या तरुणांनी आम्हाला साथ दिली आहे. दिल्लीत आज लागलेला निकाल हे दाखवून देतो आहे की भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही सर्वात आधी हरियाणात अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड केला, आता दिल्लीत नवा इतिहास रचला गेला आहे असेही मोदी म्हणाले. आपले दिल्ली हे काही फक्त शहर नाही तर मिनी हिंदुस्थान आहे. दिल्ली हा लघुभारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारत हा विचार घेऊन जगणारं शहर आहे असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दिल्लीत 27 वर्षानंतर कमळ फुलले –
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जबरदस्त हार पत्करावी लागली. स्वतः केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत आहे. तर तब्बल 27 वर्षानंतर भाजपला राजधानी दिल्लीत मिळालेले घवघवीत यश हे त्या पक्षाच्या जल्लोषाचे कारण ठरले असून भाजपमध्ये आज दिवाळीचा उत्साह असल्याचे दिसून आले.
केजरीवाल जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी उपलब्ध सर्व साधनांच्या माध्यमातून ताकद पणाला लावली होती पण; शेवटी त्यांना सत्तेतून पायउतार व्हावेच लागले. काँग्रेसला फार अपेक्षा नसल्या तरी पुन्हा शून्यातून उभे राहावे लागणार आहे. आपला मोठया नेत्यांचा पराभव पचवून पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षात नवीन ऊर्जा निर्माण करावी लागेल. तर दिल्ली करांच्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याची मोठी जबाबदारी भाजपच्या खांद्यावर आहे. एकूणच पुढील पाच वर्षे सर्वच पक्षांसाठी कसोटीची राहणार आहेत.
भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंट
आपच्या पराभवाच्या कारणांची यादी केली गेली तर त्यात केजरीवाल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे तुरूंगात जाणे यास पहिल्या क्रमांकावर ठेवावे लागेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, डॉ. सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांच्यासह तब्बल 16 जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खावी लागली. भ्रष्टाचाररहित प्रामाणिक राजकारण करण्यासाठी केजरीवाल राजकारणात आले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरूंगात जावे लागले.
दुसरे कारण, यमुनेच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा केलेला आरोप म्हणता येईल. यमुना स्वच्छ करू असा दावा केजरीवाल यांनी केला होता. मात्र, यमुना स्वच्छ होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रदुषित होत गेली. दिल्लीकरांना नळातून दुषित पाणी मिळू लागले होते.
केजरीवाल यांनी बंगला आणि लाल दिव्याची गाडी घेणार नाही अशी हमी दिल्लीवासीयांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री बंगल्यावर झालेला अफाट खर्च आणि भाजपकडून शीशमहलचा झालेला प्रचार या गोष्टीमुळेही मतदारांनी आपकडे पाठ फिरविली असे म्हणायला हरकत नाही.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मतदानाच्या चार दिवसाआधी सादर केलेल्या बजटमध्ये 12 लाख पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला होता. प्रवेश वर्मा यांनी ज्या नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव केला त्या मतदारसंघात केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर राहतात. यामुळे आपच्या पराभवात बजेटने सिंहाचा वाटा उचलला.
केजरीवाल यांनी महिला मतदारांची मते मिळविण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे दरमहा 2100 रूपये देण्याची प्रमुख घोषणा केली होती. याशिवाय, पुजारी- ग्रंथी यांना दरमहा 18000, वृध्दांना नि:शुल्क तीर्थयात्रा अशी अनेक आश्वासने दिली होती. वीज आणि पाणी आधीपासून फ्री होते. मात्र, फ्री रेवडीची आपने सुरू केलेली परंपरा दिल्लीकरांनी मोडीत काढल्याचे म्हणता येऊ शकते.
केजरीवाल यांनी एकला चलोचा मार्ग स्वीकारला. यामुळे कॉग्रेसने सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उतरविले. या निवडणुकीत कॉग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी आपच्या मतांचे विभाजन करण्यात त्यांना यश आले आहे. थोडक्यात आघाडी न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आपला भोवला असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी 28 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरविले. परंतु, याचा कोणताही फायदा पक्षाला झाला नाही. याउलट, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठ आमदार पक्ष सोडून भाजपात सामील झाले.
केजरीवालांनी केले भाजपचे अभिनंदन –
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. जनता जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. या विजयाबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करतो. जनतेने त्यांना ज्या अपेक्षांनी बहुमत दिले आहे त्या अपेक्षा तो पक्ष पूर्ण करेल अशी अपेक्षाही केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या १० वर्षात लोकांनी आम्हाला संधी दिली. आम्ही खूप काम केले. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि इतर अनेक क्षेत्रात लोकांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आता, लोकांनी आम्हाला दिलेल्या निर्णयानुसार आम्ही केवळ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर आम्ही समाजसेवा देखील करू. लोकांच्या सुख-दु:खात मदत करू आणि वैयक्तिकरित्या, ज्यांना आमची गरज असेल, त्यांच्या सुख-दु:खात आम्ही नेहमीच त्यांना मदत करू. कारण आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाही.
ते पुढे म्हणाले, आम्ही राजकारणाला एक असे साधन मानतो ज्याद्वारे आपण जनतेची सेवा करू शकतो. ज्याद्वारे आपण लोकांना त्यांच्या सुख-दु:खात मदत करू शकतो. आपण काम करत राहू आणि भविष्यातही आपल्याला अशाच प्रकारे लोकांच्या सुख-दु:खात मदत करायची आहे. मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही खूप चांगले काम केले. तुम्ही खूप मेहनत घेतली. तुम्ही एक उत्तम निवडणूक लढवली आणि मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छितो.
आम आदमी पक्ष केवळ सत्तेबाहेर गेला नाही तर अरविंद केजरीवाल स्वतः त्यांची जागा वाचवू शकले नाहीत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. या जागेवरील मतमोजणीच्या १४ फेऱ्यांनंतर, अरविंद केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. विजेता प्रवेश वर्मा यांना 30088 मते मिळाली. काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना ७ ४५६८ मते मिळाली.
आम्ही दिल्लीचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी – प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध – हा लढा सुरूच राहील.
– राहुल गांधी, कॉंग्रेस नेते