नवी दिल्ली – देशभरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर अनेक करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने सर्वांना लस मोफत देण्याचे निश्चित केले असून विविध वयोगटातील नागरिकांना लस मिळत आहे. या लसीकरणावर मध्य प्रदेश सरकारमधील भाजपच्या महिला नेत्या आणि मंत्री उषा ठाकूर यांनी अजब आवाहन केलं आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन उषा ठाकूर यांनी केलं आहे. इंदौर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
करोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून करोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ५०० रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती आहे”, असं उषा ठाकूर म्हणाल्या. यावेळी त्यांनी मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.
उषा ठाकूर अजब विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याआधी त्यांनी देशाला करोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आजुबाजूचं वातावरण शुद्ध करण्याची गरज व्यक्त केली होती. तसेच करोनाला रोखण्यासाठी महायज्ञ करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.