हरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्‍शनचे 32 हजार रुपये जमा

Madhuvan

सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या 175 रेमडेसीवीर इंजेक्‍शनपैकी हरवलेल्या 18 पैकी 15 इंजेक्‍शन गहाळ झाल्याची जवाबदारी स्वीकारून जिल्हा रुग्णालयाने हिशोब पूर्ण केला आहे. या इंजेक्‍शनचे 32 हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले असून यासाठी चौकशी समितीच्या सदस्यांनीच पदरमोड करून ही वर्गणी गोळा केली आहे. 18 पैकी तीन इंजेक्‍शन कोविड वॉर्डातच सापडल्याची माहिती असून जिल्हा रुग्णालयाने गहाळ इंजेक्‍शन प्रकरणावर पडदा टाकला आहे. 

शरद पवार यांनी सातारा जिल्हयातील गरजू रुग्णांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे 20 जुलै रोजी 125 इंजेक्‍शन पाठवली होती. त्यानंतरच्या आठवड्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत झालेल्या कराड दौऱ्यात पुन्हा 50 इंजेक्‍शन अशी एकूण 175 इंजेक्‍शन देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत उपलब्ध साठ्यातील 18 इंजेक्‍शन गहाळ झाल्याची लेखी तक्रार प्रशासनातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केली होती. त्या प्रकरणापाठापाठ शौचालयात आढळलेल्या स्त्री भ्रूण प्रकरणाच्या तीव्र पडसादाने डॉ. आमोद गडीकर यांची बदली झाली.

दरम्यान, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे, प्रशासन अधिकारी डॉ. सुधीर बक्षी, फार्मासिस्ट गणेश लावंड व अन्य एक महिला वैद्यकीय अधिकारी अशी चौघांची चौकशी समिती नेमली. दैनंदिन कामाचा प्रचंड ताण सांभाळत समितीने या गहाळ रेमडेसीवीर इंजेक्‍शन प्रकरणाचा तपास समांतरपणे सुरू ठेवला. अनेक ठिकाणी शोधाशोधीनंतर तीन इंजेक्‍शन कोविडच्या एका वॉर्डात सापडली.

तब्बल दोन आठवडे तपास केल्यानंतरही पंधरा इंजेक्‍शन न आढळल्याने सर्व समिती सदस्य व काही परिचारिका यांनी पदरमोड करून या पंधरा इंजेक्‍शनचे 32 हजार रूपये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे डीडीद्वारे जमा केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलीस तक्रार देण्याची सूचना केली होती. मात्र वेळखाऊ चौकशी प्रक्रिया, कामाचे व्यस्त वेळापत्रक व त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाची होणारी अप्रतिष्ठा या गोष्टी टाळण्यासाठी डॉ. बक्षी, डॉ. राम जाधव, डॉ. सोनावणे व चौकशीला सहकार्य करणाऱ्या परिचारिकांनी सहमतीने पदरमोड करून या इंजेक्‍शनचे पैसे शासनाच्या तिजोरीत जमा केले. या पैशाचा धनादेश चौकशी समितीचे सदस्य सचिव डॉ. सुधीर बक्षी यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. दोन महिन्याच्या अंतराने अखेर गहाळ इंजेक्‍शन प्रकरणावर पडदा पडला.

तरीही 15 इंजेक्‍शन गेली कुठे?
जिल्हा रुग्णालयाने रेमडेसीवीर इंजेक्‍शनचे पैसे जमा करून या प्रकरणावर पडदा टाकला तरी 15 इंजेक्‍शन कुठे गेली हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. रेमडेसीवीरचा सध्या सातारा जिल्हयात प्रचंड काळा बाजार सुरू आहे.

मग ती इंजेक्‍शन चढ्या भावाने विकली गेली काय, ती इंजेक्‍शन गायब करणारी जिल्हा रुग्णालयात कोणती यंत्रणा आहे, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे हे शोधण्याची गरज आहे .डॉ. सुभाष चव्हाण यांनी हे शोधून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी सातारकर करत आहेत. पदरमोड केली म्हणजे विषय संपला असे नाही, 15 इंजेक्‍शनचा हिशोब जुळला पाहिजे, अशी मते व्यक्त होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.