नवी दिल्ली : अमेरिकेने भारतीयांच्या पाठवणीसाठी वापरलेली पद्धत अमानवी असल्याचा आरोप कॉंग्रेसने लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर, त्या पक्षाच्या दिल्ली शाखेने त्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे.
अमेरिकेने अवैध वास्तव्याचा ठपका ठेवत नुकतेच 104 भारतीयांना मायदेशी पाठवले. त्यावरून देशातील राजकारण तापले आहे. संबंधित घटनेचा निषेध करत विरोधकांनी संसदही दणाणून सोडली. आता त्या घटनेवरून कॉंग्रेसने आणखी पुढचे पाऊल उचलत मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला. दिल्ली कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे एक निवेदन सादर केले.
भारतीय नागरिक रोजगाराच्या शोधात अमेरिकेला गेले. ते गुन्हेगार नाहीत किंवा कुठल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांत सामील नव्हते. मात्र, त्यांची अमेरिकी लष्कराच्या विमानातून अतिशय अयोग्य प्रकारे पाठवणी करण्यात आली. सुमारे 40 तासांच्या प्रवासात त्यांच्या हातांमध्ये बेड्या घालण्यात आल्या. ती पद्धत मानवाधिकारांचा गंभीर भंग करणारी आहे.
भारतीयांची तशाप्रकारे पाठवणी का करण्यात आली याची चौकशी व्हावी. भविष्यात आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या अशा घटना घडणार नाहीत याची निश्चिती करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. वस्तुस्थितीसह लेखी उत्तर देण्याची ग्वाही आयोगाकडून देण्यात आली आहे. राहुल यांच्या पत्रकार परिषदेनंतर आयोगाने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
आयोग राजकीय पक्षांना प्राधान्यक्रमावरील घटक मानतो. तसेच त्यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या विचारांना, सूचनांना आणि त्यांच्याकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना अतिशय महत्व देतो, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले. तसेच, आयोगाच्या दृष्टीने मतदार सर्वोच्च असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.