राष्ट्रवादीने बोलावली तातडीची बैठक; राजकीय उलथापालथींना वेग
पुणे: सध्या राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन भाजप- शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु असून मागील आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील घडामोडींचा वेग आल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच 4 नोव्हेंबरला ही भेट होणार आहे. मात्र या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कडून नवीन रणनीती आखण्यात आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रवाना झाले आहेत. यावेळी भुजबळांनी युतीच्या तिढ्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेला पूर्ण वेळासाठी मुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी आहे. त्यामुळे ती संधी शिवसेनेने दवडू नये असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे भुजबळांनी सेनेला अप्रत्यक्ष पणे राष्ट्रवादी सोबत येण्याचा इशारा केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान दोनच दिवसापूर्वी छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीने भुजबळ बैठकीकडे रवाना झाले आहेत. भुजबळ थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या बैठकीत जात असल्याने, ही बैठक तितकीच महत्त्वाची आणि राजकीय उलथापालथ घडवणारी ठरते की काय असा प्रश्न आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, सुमित तटकरे, धनंजय मुंडे आदि नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूकीचा निकाल लागून ९ दिवस झाले तरी राज्यात सत्तेची स्थापना झालेली नाही. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत सत्ता स्थापने बाबत चर्चा होणार का ? तसेच शिवसेनेला पाठींबा देणार का ? याबाबतही चर्चा होणार असल्याचं बोलाल जात आहे.