पुणे – प्रवाशांच्या तक्रारी किंवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये संबंधित आगारप्रमुख आणि विभाग प्रमुखांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दररोज एसटीने लाखो नागरिक प्रवास करतात. अनेकदा प्रवासामध्ये मिळणारी सेवा, कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येतात. सध्या प्रवाशांना प्रशासनाशी संपर्क साधण्यास अडचणी येत आहेत. याबाबत तक्रारी आणि सूचनांबाबत प्रवाशांना थेट संपर्क साधता यावा आणि यावर तोडगा काढण्यात यावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या आगाराची एसटी असेल, त्या आगाराचे प्रमुख आणि विभाग प्रमुखांचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येत आहे.