चऱ्होलीत होणार “ई-बस’साठी आगार

पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी प्रत्येकी 3 आगारांची निर्मिती
पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होत असलेल्या नवीन ई-बसेससाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसाठी प्रत्येकी 3 अशा 6 नवीन आगारांची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. शहरामध्ये चऱ्होली, पिंपळे सौदागर, भोसरी मध्ये ई-बसेससाठी आगार निर्मिती केली जाणार आहे.

सद्यस्थितीला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 150 ई-बसेस धावत असून, त्यासाठी पुण्यात भेकराईनगर, तर पिंपरी-चिंचवड येथे निगडीत ई-बस आगाराची निर्मिती केले आहे. मात्र, येत्या काळात “पीएमपी’च्या ताफ्यात आणखी बसेस दाखल होणार असल्याने नवीन आगार निर्मिती करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची धुरा सांभाळताना “पीएमपी’ प्रशासन सकारात्मक बदल करीत आहेत. ई-बसची खरेदी करण्यात आली आहे. यामुळे पीएमपीच्या महसुलात व प्रवाशी संख्येत भर पडत आहे. येत्या काळात ई-बसची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टिने आगाराची गरज लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येकी 3 नवीन आगार निर्माण करण्याचे ठरविले आहे.

येत्या काळात पीएमपीच्या ताफ्यात ई-बसेसची संख्या वाढणार असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने सहा आगारांची निर्मिती केली जाणार आहे. ई-बसेसची संख्या पीएमपी ताफ्यात वाढत जाणार असल्याने याबाबत पीएमपी प्रशासनाने आगार निर्मितीचे नियोजन केले आहे.
– प्रियांका सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल.

Leave A Reply

Your email address will not be published.