आरोग्य, समाजकल्याण विभागाला धरले धारेवर

पुणे – औषध घोटाळा प्रकरण चौकशीला तीन महिने झाले “रिझल्ट’ काय? रस्ता रुंदीकरणात दुकाने राहिली पण “शाळा पाडली’? सौर अभ्यासिकेचा अट्टाहास कशासाठी? आदिवासी नागरिकांसाठी घेण्यात येणाऱ्या भांड्यांचे काय झाले? असे एकावर एक प्रश्‍नाचा भडिमार करत सदस्यांनी आरोग्य, समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “स्वत:च्या फायद्यासाठी मनाला येईल ती खरेदी करू नका, नागरिकांना उपयोग होईल अशा वस्तू द्या,’ असा शब्दांत सदस्यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) पहिलीच स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, सुरेखा चौरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, भाजपा गटनेते शरद बुट्टेपाटील, आशा बुचके, रणजीत शिवतरे यासह पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

आचारसंहितेनंतर पहिली झालेली स्थायी समितीची बैठक चांगलीच वादळी ठरली. मात्र, नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनीही शांततेची भूमिका घेत सदस्यांच्या “हो’ला हो केले. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत चौकशी, कार्यवाही, कामे सुरू होतील या अश्‍वासनांवर बैठक संपली.

चुकीच्या प्रथांना वेळीच आवर घाला
जिल्हा परिषदेत अनेक चुकीच्या प्रथा सुरू झाल्या आहेत. परस्पर कामे मार्गी लावली जात असून सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. त्यामुळे या चुकीचा प्रथांना वेळीच आवर घाला आणि लोकांच्या हिताचे निर्णय घ्या, असा सल्ला सदस्यांनी बैठकीत दिला. मात्र, हा सल्ला कोणत्या पदाधिकाऱ्यासाठी होता? दरम्यान, आचारसंहिता संपली, आता उरलेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावण्याचे मोठे उद्दिष्ट जिल्हा परिषदेसमोर आहे. त्यामुळे स्वत:चा फायदा बघण्याऐवजी नागरिकांना कशा फायदा होईल, तत्काळ विकास कामे सुरू कशी होतील, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना सदस्यांनी बैठकीत मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.