विमानात 423 प्रवाशांची आणण्याची सोय
पाच डॉक्टर्सही तैनात
नवी दिल्ली – चीनच्या कोरोना व्हायरसग्रस्त वुहान प्रांतात अडकलेल्या भारतीय नागरीकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे 423 प्रवासी क्षमता असलेले विमान तिकडे पाठवण्यात आले असून हे विमान आज साडेबारा वाजता दिल्ली विमानतळावरून वुहान कडे रवाना झाले. विमानात पाच डॉक्टर्स आणि अन्यही वैद्यकीय कर्मचारीही त्यात तैनात ठेवण्यात आले आहेत.
एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी सांगितले की या विमानातून जे प्रवासी इकडे आणण्यात येणार आहेत त्यांना विमानातील कोणतीही अंतर्गत सेवा उपलब्ध नसेल. कारण अशा सेवेसाठी त्यात वेगळा कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आलेला नाही. या प्रवाशांचे अन्न त्यांच्या प्रत्येकाच्या खुर्चीवर आधीच पॅक करून ठेवलेले असेल. केबिन क्रु आणि प्रवाशांमध्ये संवाद टाळण्यात येणार आहे. या विमानातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि अन्य दक्षता घेण्यात आली आहे असेही त्यांनी नमूद केले. विमानातील डॉक्टर्स आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. हे विमान दोन-तीन तासातच वुहानला पोहोचेल.
चीन मधील भारतीय दूतावासाने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांशी संपर्क केला असून त्यांच्या इच्छेनुसार त्यांना या विमानातून परत आणण्यात येणार आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील सहाशे भारतीय नागरीकांशीही दूतावासाचे संपर्क केला आहे.