लंडन – दाट धुके आणि अल्प दृश्यमानतेमुळे ब्रिटनची विमान वाहतूक आज विस्कळीत झाली. काही विमानांची उड्डाणे उशीराने होतील, असे गेटविच विमानतळाने म्हटले आहे. शुक्रवारी देखील कमी दृश्यमानतेमुळे काही विमानांच्या उड्डाणांना ३ तासांचा उशीर झाला होता.
गेटविच विमानतळावरून युरोपात जाणाऱ्या किमान ४० विमानांची उड्डाणे शनिवारी सकाळीही रद्द करावी लागली होती. प्रवाशांनी आपल्या विमानांचे वेळापत्रक तपासावे, अशी सूचना हिथ्रो विमानतळानेही केली आहे.
दाट धुक्यामुळे दृश्यमानता १०० मीटरपेक्षाही कमी होईल, असा अंदाज ब्रिटनच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. या धुक्यामुळे प्रवाशांनी थोडा जास्तीचा वेळ गृहित धरावा आणि आपल्या वेळेचे नियोजन करावे, असेही या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
रविवारी सकाळी हवामानात थोडी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र दृश्यमानता सुधारेपर्यंत हवाई वाहतुकीवरील निर्बंध कायम राहतील, असे देशातील हवाई वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवसात उद्योग व्यवसायिकांना कराव्या लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासात या निर्बंधांमुळे अडथळे आले आहेत.