दाट धुक्‍याने बेल्ह्यातील परिसर झाकोळला

‘मॉर्निंग वॉक’वाले आनंदात ः शेतकरी मात्र चिंतेत
बेल्हे  (वार्ताहर) – बेल्हे, राजुरी, साकोरी, निमगाव सावा, पारगाव, मंगरूळ (ता. जुन्नर) या भागांत बुधवारी (दि. 28) दाट धुके पडल्याने पहाटे परिसर झाकोळला होते.

यावर्षी वातावरणात होणाऱ्या बदलामुळे या महिन्यात धुक्‍याचा अनुभव नागरिकांना घेता आला. या दिवसांमध्ये धुके बहुदा अनुभवता येत नाही; परंतु या वर्षी वातावरणात खूप बदल झाल्याने धुके पसरत आहे .बुधवारी (दि. 28) सकाळी 9 वाजेपर्यंत जुन्नरच्या पूर्व भागात दाट धुके पसरल्याने समोरचे काहीच दिसत नसल्याने संपूर्ण परिसर झाकोळल्यासारखा दिसत होता. मागच्या आठवड्यामध्ये थंडी गायब झाली होती; परंतु सोमवारपासून वातावरणात बदल पुन्हा होऊन परिसररात थंडीची लाट पसरली आहे.

अनेकदा असा गारवा अनुभवण्यासाठी काही मंडळी माथेरान, महाबळेश्‍वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जातात; परंतु यावर्षी अशा वातावरणाचा अनुभव जुन्नरकरांना घरबसल्या येत आहे. या दाट धुक्‍यामुळे समोरील रस्ताही दिसत नव्हता. त्यामुळे सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास रस्त्यांनी जाणारी वाहने दिवे लावून जाताना दिसत होती. परंतु वातावरणाच्या या बदलाचा परिणाम पिकावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी वर्गावर चिंतेच सावट आहे.

प्रवाशांनी लुटला धुक्‍याचा आनंद
सकाळी अणे घाटात प्रवासी वाहने थांबून दाट धुक्‍याचा अनुभव घेत होती. नागरिकांनी सकाळी धुक्‍याचा आनंद घेत “मॉर्निग वॉक’ची मजा घेतली. हवेतील गारवा आणि धुक्‍याचा मनमुराद आनंद घेत घड्याळाकडे दुर्लक्ष केले, तर धुक्‍याची आणि धुक्‍यात स्वत:ची छायाचित्रे काढून अनेकांनी व्हॉट्‌सऍपवर देखील पाठवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.