ओडेन्स – भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मंगळवारपासून सुरू झालेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात त्याने ख्रिस्तो पोपोव्ह याचा पराभव केला. आता दुसऱ्या फेरीत त्याची लढत डेन्मार्कचा हान्स क्रिस्तियन सोलबर्ग व बेल्जियमचा मॅक्सिम मोरेल्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
करोनाचा धोका वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून सर्व क्रीडाक्षेत्र ठप्प झाले होते. त्यानंतर आता जवळपास सहा महिन्यांनंतर विविध स्पर्धा सुरू झाल्या. डेन्मार्कमधील करोनाचा धोकाही खूपच कमी झाल्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून भारताच्या महिला खेळाडूंनी माघार घेतल्याने केवळ पुरुष खेळाडूंवरच आव्हान अवलंबून आहे.
त्यातच इतक्या मोठ्या कालावधीनंतर पहिलीच स्पर्धा तसेच त्यातील पहिलाच सामना खेळतानाही लक्ष्यने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पहिल्या फेरीच्या या लढतीत पोपोव्हवर 21-9, 21-15 अशी मात केली. दुसरी गेम अत्यंत अटीतटीची ठरली. मात्र, सेन याने आपला सर्व अनुभव पणाला लावत पोपोव्हचे आव्हान मोडून काढले.
भारताची ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने पुरुष खेळाडूंवरच भारताची भिस्त आहे. त्यातही आता सेन याच्यासह किदम्बी श्रीकांत याच्याकडूनही अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. श्रीकांतने 2017 साली याच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तर, सेन याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच स्पर्धांचे विजेतेपद पटकावत आपला दबदबा प्रस्थापित केला होता.