डेन्मार्क बॅडमिंटन : सलामीच्या सामन्यात श्रीकांतचे वर्चस्व

ओडेन्स – भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यानेही लक्ष्य सेनच्या पावलावर पाऊल ठेवत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवत आगेकूच केली. 

पहिल्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतने इंग्लंडचा मानांकित खेळाडू टॉबी पेन्टी याच्यावर केवळ 37 मिनिटांत 21-12, 21-18 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. पेन्टी याने गेल्या दोन मोसमांत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सातत्याने दबदबा प्रस्थापित केला होता. या सामन्यात मात्र, त्याला श्रीकांतने हतबल केले.

श्रीकांतच्या खेळात स्मॅशचा सर्वाधिक वापर झाला. तसेच त्याचे अप्रतिम रिटर्नही पेन्टीला परतवणे जमले नाही. करोनामुळे गेले जवळपास सहा महिने जागतिक क्रीडा क्षेत्र ठप्प झाले होते. त्यामुळे इतक्‍या मोठ्या ब्रेकनंतरही श्रीकांतच्या खेळात कोणताही कमकुवत दुवा दिसला नाही.

दुसऱ्या फेरीत श्रीकांतची लढत भारताचा नवोदित खेळाडू शुभंकर डे व कॅनडाचा जेसन ऍन्थनी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. याच फेरीत लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्याच हान्स क्रिस्तियन सोलबर्ग याच्याशी होणार आहे.

भारताच्या प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने श्रीकांत आणि लक्ष्य सेन तसेच नवोदित शुभंकर डे या तीनही खेळाडूंकडून सरस कामगिरीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.