नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होण्याची चिन्हे आहेत. सोमवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तत्पूर्वी रविवारी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात डेंग्यूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली.
लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात रुग्णालयात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. पूर्व दिल्लीतील गांधी नगर येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला २७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूने पीडित या व्यक्तीला 8 सप्टेंबर रोजी मृत जाहीर करण्यात आले. तथापि, डेंग्यूमुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली.
दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, 2024 मध्ये राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत डेंग्यूची 650 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सन 2023 मध्ये दिल्लीत डेंग्यूचे 9,266 रुग्ण आढळून आले आणि 19 जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी, जी-20 परिषदेपूर्वी, महापालिकेने डेंग्यूचे रुग्ण आणि मृत्यूचे साप्ताहिक अहवाल देणे बंद केले होते.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे तीव्र ताप, जो दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये 104 अंश फॅरेनहाइट नंतरच ताप कमी होतो. असा जास्त ताप आल्यास डेंग्यू हे कारण असू शकते.
याशिवाय, तुमच्या त्वचेवर खाज सुटणारे लाल ठिपके ही देखील लक्षणे आहेत. त्याच्या लक्षणांमध्ये स्नायू आणि सांधे दुखणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे यांचा समावेश होतो. डेंग्यू तापाने ग्रस्त बहुतेक रुग्णांना सतत मळमळ आणि उलट्या होतात. दीर्घकाळ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता डेंग्यूचे लक्षण असू शकते.