सातारा – सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असताना साथीच्या रोगांनी सुद्धा डोके वर काढले आहे. इतर ठिकाणी दोन दिवसांपासून डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू यासह साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. साथीच्या आजाराचे 46 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांनी तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहे. याशिवाय स्वाईन फ्ल्यू संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून दोन डॉक्टर व तीन नर्सचे पथक तैनात करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले. सिव्हिल प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासनाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना साथीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील सोमवार पेठ, मोळाचा ओढा, करंजेसह काही भागात आणि ग्रामीण भागातील मांडवे, निनाम, अपशिंगे, लावंघर यासह इतर भागात डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू ची लागण झाली आहे. स्वाईन फ्ल्यूचे 6 तर डेंग्यूचे 40 हून अधिक रुग्णांवर सिव्हिलसह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा शहरासह तालुक्याच्या अनेक भागात साथीच्या आजाराने डोके वर काढले असताना मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुविधांअभावी अडचणीत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबत त्वरित माहिती घेतली. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील संबंधित विभागाच्या वैद्यकीय अधिकार्यांना याबाबत सुचना करून रुग्णांचा आढावा घेतला. तसेच डॉ. माने यांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सातारा शहरासह परिसरातील गावांचा सर्व्हे करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, शनिवारी ही डेंग्यू सदृश रुग्ण आढल्याने आरोग्य विभागापुढे आवाहन निर्माण झाले आहे. सातारा शहराच्या आरोग्य विभागाकडे सुध्दा काही संशयित रुग्ण असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र खासगी रुग्णालयातील उपचारांमुळे रुग्णांच्या नोंदी मात्र उपलब्ध झालेल्या नाहीत.
हवामानात वारंवार बदल होत असल्याने साथीचे आजार पसरत आहेत. कोणासही आजारपण जाणवले तर त्यांनी त्वरित उपचार घ्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे त्यामुळे दुसऱ्यास त्याची लागण होणार नाही. जिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. रुग्णालयात कोणाचीही हेळसांड होणार नाही.
डॉ. आमोद गडीकर , जिल्हा शल्य चिकित्सक.