डेंग्यूचा कहर थांबेना, दवाखाने हाऊसफुल्ल

शहरात 13 दिवसांत डेंग्यू सदृश्‍य आजाराचे 651 रुग्ण दाखल: दोन महिन्यांत 85 जणांना डेंग्यूची लागण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात 2 महिन्यांपासून एडिस इजिप्ती डासांचा कहर सुरुच आहे. शहरातील शेकडो रुग्ण डेंग्यूने त्रस्त आहेत. डेंग्यूची सुरू असलेली साथ कमी न झाल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. नोव्हेंबर महिन्यात 13 दिवसांतच 651 डेंग्युसदृश्‍य रुग्णांपैकी 22 जणांना डेंग्युची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून दोन महिन्यात 85 जणांना डेंग्युची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यापासूनच डेंग्यूने थैमान घातले आहे. एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे अंगदुखी, ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 531 डेंग्युसदृश्‍य अजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 44 जणांना डेंग्युची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सप्टेंबर महिन्यात सुरु झालेली डेंग्युची साथ ऑक्‍टोबर महिन्यात अधिकच वाढली. ऑक्‍टोबर महिन्यात डेंग्युसदृश्‍य आजाराचे 948 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 63 जणांना डेंग्युची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. मोठ्या प्रमाणात साथ फोफावत असल्याने महापालिकेने डेंग्यु रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, त्याला अपेक्षित यश आलेले नाही. नोव्हेंबर महिन्यातही डेंग्युचा कहर सुरुच आहे. 1 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या 13 दिवसांतच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 651 डेंग्युसदृश्‍य आजाराचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 22 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, शहराला पडलेला डेंग्यूचा विळखा तीन महिन्यानंतरही संपवण्यात महापालिकेला अपयश आले आहे.

एक दिवस कोरडा पाळा
एडिस इजिप्ती या डासाची स्वच्छ पाण्यामध्ये डासोत्पती होते. प्रामुख्याने नाराळाची करवंटी, शोभेच्या कुंड्या, फुलदाणी, निरुपयोगी टायर, कुलर, एसीमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्युच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे, अशा ठिकाणी स्वच्छता करुन कोरडे करणे आवश्‍यक असते. त्यामुळे, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा असे अवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयेही फुल्ल
वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश्‍य आजाराने दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, मागील काही दिवसांत खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याने खाजगी रुग्णालयेही हाऊसफुल झालेली आहेत.

झोपडपट्टी भागात स्वच्छता मोहिम आवश्‍यक
शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये परतीच्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नालेही अस्वच्छ आहेत. त्यामुळे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होत आहे. परिसर अस्वच्छ असल्याने डासोपत्ती मोठ्या प्रमाणात होत असतानाही प्रशासन याकडे गांभिर्याने पहात नसल्याने शहरात डेंग्युचा कहर सुरुच असल्याचे पहायला मिळत आहे.

धुर फवारणी, ऍबेटिंग मोहिम गरजेची
महापालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून धुर फवारणी, ऍबेटिंग मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र, काही भागात अद्यापही अशी फवारणी झालेली नाही. ऑक्‍टोबर महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्यानंतर ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु होती. त्यानंतर मात्र, मनपाचे कर्मचारी ही मोहीम राबवताना दिसले नाहीत. सद्य स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पती होत आहे. मात्र प्रशासन याकडे गांभिर्याने पहात नसल्याने डेंग्यूसदृश्‍य रुग्णांची संख्या वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.