डेंग्यू आणि काळजी

डेंग्यू या एकाच शब्दामुळे मनात भयंकर कल्पना येऊ लागतात आणि का येऊ नयेत? या आजाराचे असे काही गंभीर दुष्परिणाम आहेत, जे प्राणघातक असू शकतात किंवा जन्मभर टिकू शकतात. डेंग्यूमुळे थ्रॉम्बोसायटोपीनीया (प्लेटलेट्‌सची संख्या घटणे) होतो हे अनेकांना माहीत असते पण असे झाल्याने काय काय होऊ शकते याची कल्पना किती जणांना आहे?
डेंग्यूचे विषाणू प्लेटलेट्‌सचा नाश करतात आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी करते.

रक्त गोठवून रक्तस्त्राव थांबवण्याच्या क्रियेमधील प्लेटलेट्‌स हा एक महत्त्वाचा घटक असतो. जेव्हा प्लेटलेट्‌सची संख्या कमी होते तेव्हा रक्तस्त्राव रोखणे कठीण होऊन बसते. प्लेटलेट्‌सबरोबरच या आजाराचे विषाणू त्वचा, नाकातील चिकट स्त्राव (म्युकोसा), हृदय, मेंदू, डोळे इत्यादींनाही हानी पोहोचवतात. या हानीमुळे पेशी मरण पावतात/पेशींचे कार्य बंद पडते. परिणामी शरीरातील विविध पोकळ्यांमध्ये रक्तस्त्राव/द्रव साठणे या गोष्टी होऊ शकतात.

हा विषाणू हृदयाच्या स्नायूंवरही परिणाम करतो, ज्यामुळे त्याचे कार्य सुरळीतपणे चालू शकत नाही व परिणामी हृदयाचे आकुंचन प्रसरणाचे कार्य मंदावते. बरेचदा ही हानी वर्षभरात भरून निघते मात्र काही थोड्या व्यक्तींच्या बाबतीत या यंत्रणेत कायमचा बिघाड होतो. अशा व्यक्तीच्या हृदयाच्या आकुंचन प्रसरणाचा वेग आयुष्यभर मंद राहतो. यामुळे हृदयाच्या इलेक्‍ट्‍रॉनिक सर्कीट्‌सवरही परिणाम होतो, ज्यामुळे नाडीचे ठोके अनियमित पडतात.

या विषाणूंमुळे किडनीच्या कार्यावरही विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्यांचे कार्य बंद होऊ शकते (रीनल फेल्युअर). अनेकदा किडनीच्या कार्यावर झालेला परिणाम हा आपणहून कमी होतो पण प्रत्यक्ष किडन्यांना हानी पोहोचल्यास ही गोष्ट प्राणघातक ठरू शकते. याखेरीज डोळ्यांना हानी पोहोचल्याने अंधत्व येणे, प्रोग्रेसिव्ह पॅरालिसिस (जीबी सिंड्‍रोम) अशा गुंतागुंतीच्या समस्याही या आजारामुळे उद्भवत असल्याची नोंद आहे. हे विषाणू नाळेची भिंत पार करून गर्भापर्यंतही पोहोचतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी.

डेंग्यूची काही लक्षणे तसेच त्याच्या प्रतिबंधासाठीचे काही उपाय पुढीलप्रमाणे:

अनेक दिवस ताप राहिल्यास
प्रचंड डोकेदुखी आणि डोळ्यांच्या मागच्या बाजूला वेदना
स्नायू आणि सांधे दुखणे
भूक न लागणे
उलट्या आणि अतिसार
त्वचेवर चट्टे उठणे
रक्तस्त्राव, बहुतेकवेळा नाकातून किंवा हिरड्यांतून रक्त येणे.

डेंग्यूला अटकाव करण्यासाठी:

कपडे: लांब पॅंट, लांब हाताचे शर्ट, मोजे घालणे, पॅंटचे पाय मोज्यांत खोचणे व टोपी घालणे अशा उपायांनी शरीर जास्तीत-जास्त झाकून घेणे.

मॉस्कीटो रिपेलन्ट्‌स: मॉस्कीटो रिपेलन्ट केमिकलचे किमान 40% प्रमाण असलेले रिपेलन्ट वापरा, किंवा जास्त काळ बाहेर राहणार असाल तर या घटकाची मात्र अधिक असलेले रिपेलन्ट वापरा. याचा वापर लहान मुलांसाठी करू नये.

मॉस्कीटो ट्रॅप्स आणि मच्छरदाण्या: किटकनाशके लावलेल्या जाळ्या अधिक परिणामकारक असतात. नाहीतर जाळीला लागून उभे राहिल्यास डास जाळीतूनही चावू शकतात.

दारे आणि खिडक्‍यांना जाळ्या: खिडक्‍यांना जाळ्या किंवा स्क्रीन्स असे अडथळे निर्माण केल्यास डास घराबाहेर राहण्यास मदत होते.

सुगंधी वस्तू टाळा: खूप घमघमीत वासाचे साबण किंवा परफ्युम्स यांमुळे डास आकर्षित होतात.

कॅम्पिंगसाठी सामान: कपडे, बूट आणि कॅम्पिंगचे यांना पर्मेथ्रिन हे किटकनाशक लावा किंवा असे किटकनाशक आधीच लावलेले कपडे खरेदी करा.

डासांच्या वेळा टाळा: पहाटे, दिवस मावळताना आणि संध्याकाळ सुरू होताना उघड्यावर जाणे टाळा.

साचलेले पाणी: या आजाराचा फैलाव करणारे एडीस जातीचे डास स्वच्छ, साचलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे पाणी साचलेले राहू नये याकडे लक्ष देणे व कुठे दिसल्यास ते काढून टाकणे यामुळे या आजाराचा धोका कमी होऊ शकतो.

कांचन नायकवडी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)