डेंग्यूप्रश्‍नी प्रशासन अद्यापही ढिम्मच!

नेवासा – अस्मानी संकटातून सावरत असताना आता नेवासाकरांना डेंग्यूने ग्रासले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्‍यात थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. मात्र प्रशासन व आरोग्य विभाग अद्याप ढिम्मच आहे. प्रशासनाकडे तालुक्‍यातील रुग्णांची साधी आकडेवारीही उपलब्ध नसल्याने प्रशासनास या आजाराचे किती गांभीर्य आहे, हे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या भागातील नागरिक तापाने फणफणत आहेत. काही रुग्णांच्या प्लेटलेट्‌स झपाट्याने कमी होत आहेत. डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत आहेत. स्वच्छ पाणी साठ्यांत डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीसाठा करू नये, अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात येतात.

शहरात तब्बल 5-6 दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील बहुतांशी वर्ग कामगार, कष्टकरी आहे. त्यामुळे त्यांना पाणीसाठा करण्याशिवाय पर्यायही नाही. तालुक्‍यात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने सध्या तालुकाभर घरो-घरी जाऊन सर्वेक्षण सुरू असल्याने घरात किंवा घराबाहेर पाणीसाठे आढळल्यास त्यामध्ये टेमिफोस औषध टाकून डास आळी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणीसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी रक्ताची तपासणी करण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

आरोग्य विभाग करते काय?

शहरात तसेच तालुक्‍यातील सर्वच गावांत तापाचे रुग्ण वाढत असताना नेवासा शहरात नगरपंचायतीकडून तसेच तालुक्‍यात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र ही बाब कोणीच गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे. तालुक्‍यातील खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. आरोग्य विभागाकडे शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य विभाग नेमका करतो काय, असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.