प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र लढा देण्याचा इशारा कामगारांनी दिला. दरम्यान, या आंदोलनानंतर कामगारांच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन अध्यक्ष उदय भट यांच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आले.
या आंदोलनावेळी दर महिन्यास निश्चित केलेल्या तारखेस कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, विलंबाने वेतन देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, कामगारांना “पीएफ’ व “इएसआय’चे कार्ड द्यावे, कंत्राटी कामगारांना बंद करण्यात आलेला बोनस, घरभाडेभत्ता पुन्हा सुरू करावा, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना पुन्हा पगार पावती देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
युवक कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा
महापालिका प्रशासन ठेकेदारांना वेळेवर पैसे देते, तरीही त्यांच्याकडून कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतने दिले जात नाही. पालिकेने पैसे दिले नाहीत, असे कारण सांगण्यात येते. मात्र, प्रशासन आणि ठेकेदारातील या आरोप प्रत्यारोपाचा फटका सर्वसामान्य कष्टकऱ्यांना बसत असून, महापालिकेकडे पैसे असतानाही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. आयुक्तांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून तातडीने वेतन देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा युवक कॉंग्रेसच्या वतीने कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.