तेहरान – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निषेधार्थ इराणमधील कट्टरवाद्यांनी निदर्शने केली आहेत. तेहरानच्या जवळ झालेल्या या निदर्शनांच्यावेळी अमेरिका आणि इस्रयलच्या राष्ट्रध्वजांचे दहन करण्यात आले. अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
इस्रायल आणि बहुतेक अरबी देशांदरम्यानचे संबंध सामान्य केले जाण्याच्याविरोधातही यावेळी उग्र निदर्शने करण्यात आली. अमेरिकेच्या पूर्वीच्या प्रशासनाच्या काळात इस्रायल आणि अरब देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे.
सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मध्यपूर्वेच्या सुरक्षेला अमेरिका वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. मध्यपूर्वेत निर्माण होणाऱ्या पोकळीला रशिया, चीन अथवा इराण भरून काढण्याचा प्रयत्न करू शकेल, अशी शक्यताही बायडेन यांनी सौदीतील परिषदेत वर्तवली होती.
दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या 61 जणांवर निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री माईक पॉम्पेओ आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉन बोल्टन यांचाही समावेश आहे. विदेशातील इराणी असंतुष्ट गटांना पाठिंबा दिल्याच्या मुद्यावरून हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
इराणने अलिकडच्या काळात अनेक वेळा अशा प्रकारे इराणच्या विरोधात कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या नेत्यांवर प्रातिनिधिक निर्बंध घातले आहेत. अलिकडच्या काळात हत्या झालेल्या इराणच्या अणू संसोधकाच्या कुटुंबियांना 4 अब्ज डॉलरची भरपाई देण्याचे आदेश इराणमधील न्यायालयाने जून महिन्यात अमेरिकेच्या प्रसासनाला दिले होते.