कोळगाव (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील महावितरण कार्यालयासमोर कोळगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी शेतीसाठी आठ तासांच्या अंतराने तीन शिफ्टमध्ये चालू असलेली वीज दोन शिफ्टमध्ये पूर्ण दाबाने सुरू करावी, गावठाण मध्ये सिंगल फेज वीज सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत चालू ठेवावी, बिलाची आकारणी रिडिंगप्रमाणे करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या मार्गदर्शनाखाली आज धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता दिपककुमार सिंग यांनी तक्रारींचे निवेदन स्वीकारत 33 केव्ही लाईन 8 दिवसात दुरुस्त करण्यात येईल, तर पहाटे 4 वाजता जाणारी सिंगल फेज वीज सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे सांगतले. बिलाची आकारणी रिडींग प्रमाणे करण्यात येईल, तसेच वीज वितरण व्यवस्थेतील सर्व तक्रारींचा निपटारा करून सुरळीत वीज वितरण करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
या धरणे आंदोलनासाठी कोळगावचे उपसरपंच भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन नलगे, कुकडी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन विश्वास थोरात, ग्रा. सदस्य हेमंत नलगे, अमित लगड, शरद लगड, संतोष मेहत्रे, संपत शिरसाठ, संदीप दिवेकर, जयराज लगड, गुलाब आढाव वीज वितरण कंपनीचे कर्मचारी नानासाहेब बांदल, एम. टी.मेहत्रे आदी उपस्थित होते.