वरुण वज्र वाहनाद्वारे प्रात्यक्षिक

शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आता मागील वर्षापासून प्रशासनाने दखल घेतली आहे. एक जानेवारी रोजीचा मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन वेगवेगळे पर्याय वापरत आहे. आता कोरेगाव भीमा येथील परिसरात वरूण वज्र वाहनाद्वारे आग विझविण्याचे तसेच जमाव हटविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा व सणसवाडी परिसरात एक व दोन जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी देखील प्रशासनाने मागील वर्षीप्रमाणे कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दीड हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा, वरूण व वज्र वाहने, अग्निशमन बंब तसेच इतर सामुग्रीसह राज्य राखीव दलाच्या 8 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी, पोलिसांचे संचलन घेण्यात येत आहे.

आता आज वरूण वज्र वाहनाद्वारे आग विझविण्याचे तसेच जमाव हटविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वाहनातून शंभर ते सव्वाशे फूट उंच व लांब अंतरावर मोठ्या वेगाने पाण्याचे फवारे मारले जाते. त्यामुळे काही अडचण निर्माण झाल्यास तसेच जमाव पांगविण्याची वेळ आल्यास काय करावे, यासाठी हे प्रात्याक्षिक घेण्यात आले.

यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्‍वर्या शर्मा,
आँचल दलाल, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब कदम, सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. पोरे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी आदी अधिकारी उपस्थित होते.

अचानक काही प्रसंग उद्‌भवल्यास तसेच जमाव लांबविण्याची वेळ आल्यास या वरूण वज्र वाहनातील पाण्याच्या टाकीतील पाण्यामध्ये रंग टाकून वेगवेगळ्या रंगाचे पाणी या वाहनाद्वारे पाणी मारून जमाव पांगविण्यास मदत होते. उंचावर अथवा लांब लागलेली आग वाहनाद्वारे विझविण्यास मदत होत आहे. या वाहनाद्वारे तब्बल शंभर ते सव्वाशे फूट उंच अथवा लांब अंतरावर पाणी मारण्यास मदत होत आहे.- राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक, शिक्रापूर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.